निरामय विषयी

 

सर्वे सन्तु निरामयः।

काही वर्षांपूर्वीचा विचार केला तर आम्ही या क्षेत्रात येऊ असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु 2001 मध्ये माझ्या आईला हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्यामुळे इस्पितळात दाखल केले. 90% हार्ट ब्लॉकेज असल्यामुळे डॉक्टरांनी लगेच बायपास सर्जरी करण्यास सांगितले; अन्यथा ’30 दिवसांपेक्षा जास्त त्या जगणार नाहीत’ असे त्यांचे मत होते. माझ्या आईचा निसर्गोपचारावर प्रगाढ विश्वास होता, त्यामुळे तिने या सर्जरीस नकार दिला व संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगसाधना व आवश्यक औषधोपचार यांच्या साहाय्याने ती पुढे 10 वर्षे अत्यंत निरोगी व आनंदी आयुष्य जगली. असेच निरोगी जीवन सर्वांना मिळावे अशी तिची मनापासून इच्छा होती. तिच्याच इच्छेमुळे मला प्रेरणा मिळाली आणि मी व माझी पत्नी आज ‘निरामय’च्या माध्यमातून आपल्यासमोर उभे आहोत.

समाजात वावरताना आजूबाजूला अनेक पीडित लोक भेटतात. प्रत्येकाचा आजार वेगळा असतो, काहींच्या आजाराचे स्वरूप छोटे असते तर काहींना मोठ्या व्याधींनी ग्रासलेले असते. परंतु गेल्या काही वर्षांत निसर्गशास्त्र, योगशास्त्र आणि त्यासंबंधित विषयांचा सखोल अभ्यास केल्यावर आमच्या असे लक्षात आले की, आजाराचे स्वरूप जरी लहान-मोठे असले तरी त्याचे मूळ हे शरीर-मन-ऊर्जा या त्रिसूत्रीमध्येच दडलेले असते. आपल्या मनातील सकारात्मक विचार आणि शरीरातील ऊर्जेचा योग्य समतोल या गोष्टींच्या आधारे कोणत्याही आजारावर अगदी सहज मात करता येऊ शकते. याच विचारातून जानेवारी 2010 ला ‘निरामय’ ची सुरुवात झाली. उद्दिष्ट एकच होतं, ते म्हणजे आनंदी आणि निरोगी समाज घडविण्याचं.

 

 

डॉ. योगेश चांदोरकर
एम.डी.(अल्टरनेटीव्ह मेडीसिन)

संचालकांचा संदेश

डोळ्यांना न दिसणाऱ्या अदृश्य अशा उर्जेच्या महासागरात आपण सतत वावरत आहोत . हीच उर्जा आपल्या शरीरातून, रक्तातून प्रवाहित होत आहे व आपणाला सतत चैतन्य देत आहे. आपल्या शरीराभोवती असणारे अदृश्य असे उर्जा शरीर निरनिराळ्या दोषांपासून सतत आपले संरक्षण करीत आहे पण हे आपणास ज्ञात नाही.

अशा या अदृश, अज्ञात ऊर्जेमुळे असाध्य गणले जाणारे आजार देखील बरे होऊ शकतात हे स्वानुभवातून आम्हाला कळले व याचा उपयोग जास्तीत जास्त रुग्णांना व्हावा यासाठीच आम्ही निरामायची स्थापना केली.

वेगवेगळे शोध व प्रयोग सुरू होतेच. अल्टरनेटीव्ह मेडीसिनमध्ये एम.डी. करत असताना या अभ्यासाला वेग आला. दुर्धर आजारांमध्ये परिणामकारक रिझल्ट मिळू लागले. अनेक संतुष्ट रुग्णांमुळे आपुलकी, समाधान व आशीर्वादांची पोचपावती मिळाली.

गेली आठ वर्षे चाललेल्या या अथक परिश्रमाची, तुमच्यासारख्या अनेकांच्या प्रेमाची, इच्छांची व अपेक्षांची फलश्रुती म्हणजेच निरामय! निरामयचा हा वटवृक्ष असाच बहरत राहावा आणि अनेकांनी त्याच्या आश्रयाला यावे यासाठीच आम्ही व आमचे सहकारी सतत कार्यरत आहोत. रोगमुक्त झालेले रुग्ण याचा प्रसार करीत आहेत, सर्वांचे मनःपूर्वक आभार .

डॉ. अमृता चांदोरकर
एम.डी. (अल्टरनेटीव्ह मेडीसिन)

 

 

उद्धिष्ट

निरामयचा जेव्हा जन्म झाला त्यावेळी विना औषध, विना स्पर्श एखादा रोग बरा होऊ शकतो, ही संकल्पनाच मुळात नवीन होती. सुरुवातीचे चार-सहा महिने रुग्णांचा विश्वास संपादन करणे अवघड गेले, परंतु त्या दरम्यान मराठे आजींचा ऊर्जा (प्राणशक्ती) उपचारांच्या माध्यमातून बरे झाल्याचा अनुभव दै. सकाळच्या ‘मुक्तपीठ’ सदरात छापून आला. त्या दिवसानंतर आजपर्यंत कधीही कोणत्याही रुग्णांनी आमच्यावर अविश्वास दाखविला नाही. म्हणतात ना, ‘अनुभवाचे बोल मोठे असतात’, याची प्रचीती आम्हाला त्यावेळी आली.

हळूहळू अनेकांना अनुभव येत गेले व निरामयचा विस्तार होत गेला. आज ‘निरामय’च्या पुणे, मुंबई, चिंचवड व कोल्हापूर या शाखांमध्ये ८० हजारांपेक्षा अधिक समाधानी रुग्ण आमच्याशी जोडले गेले आहेत. आम्ही लावलेलं हे रोपटं आज अश्वत्थाचं रूप घेत आहे. अनेक समविचारी हात या कार्यात जोडले जात आहेत, आज मागे वळून पाहताना खूप समाधान वाटतं.

सुरुवातीपासूनच प्राणशक्ती किंवा ऊर्जेच्या माध्यमातून उपचार करताना वेगवेगळे शोध व प्रयोग सुरू होते. या प्रवासातील अनुभव आणि अभ्यासातून उपचारांमध्ये अनेक सकारात्मक बदल होत गेले. या सकारात्मक बदलांचा परिपाक म्हणजे ‘स्वंयपूर्ण उपचारपद्धती’ होय. स्वयंपूर्ण उपचारांच्या आधारे आम्ही रोगाच्या मुळापर्यंत जाऊन रुग्णांना शंभर टक्के निरोगी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. जगातल्या प्रत्येक कान्या कोपऱ्यापर्यंत स्वयंपूर्ण उपचारपद्धती पोहचावी आणि प्रत्येकाला निरामय आयुष्य जगता याव याच दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहेत.

 

 

दृष्टिकोन

शेकडो वर्षांमध्ये आपल्या प्राचीन शास्त्राचा आपल्याला विसर पडला आहे. परदेशामध्ये आपल्या पुरातन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला जातो, आपण मात्र त्यास टाकाऊ समजतो. हा समज दूर करण्यासाठीच डॉ. योगेश चांदोरकर व डॉ. अमृता चांदोरकर यांनी प्राचीन शास्त्रांचा अभ्यास करून उर्जेवर आधारित स्वयंपूर्ण उपचारपद्धती विकसित केली. असाध्य आजारांनी जखडलेल्या, अनेक प्रकारची औषधे घेऊन थकलेल्या व निरनिराळ्या शस्त्रक्रिया होऊनही तळमळणाऱ्या रुग्णांसाठी हे उपचार संजीवनी सारखे काम करतात.

समाजासाठी स्वयंपूर्ण उपचारपद्धती विकसित करताना त्यामागचा प्रांजळ हेतू हाच होता कि आपले प्राचीन शास्त्राचे महत्व सर्वसामान्यांना कळावे व त्याचा लाभ घेता यावा आणि आधुनिक शास्त्रात असाध्य वाटणारे कितीतरी आजार प्राचीन शास्त्रात साध्य होऊ शकतात हे समाजाला कळावे व त्यांची रोगातून मुक्तता होऊन निरोगी समाज घडावा. आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचा थोडासा कवडसा समाजाला दाखवावा हाच यामागचा दृष्टिकोन.